करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील वांगी नंबर ३, रोशेवाडी, वाशिंबे, वीट, निमगाव व बिटरगाव श्री येथे आमदार संजयमामा शिंदे यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती उपाय योजना) अंतर्गत अस्तित्वातील हातपंपावर सौरउर्जेवर आधारित दुहेरीपंप लघु नळ पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी प्रत्येकी ३ लाख ५७ हजार रुपये मंजूर झाले आहेत. याशिवाय ग्रामीण भागातील गावांमध्ये वाड्या वस्त्यांतर्गत आळजापूर, बिटरगाव श्री व साडे येथील तीन वस्त्यांचाही समावेश आहे. यासाठी प्रत्येकी ३ लाख ५३ हजार निधी मंजूर झाला आहे.
टंचाईची काळात ही कामे त्वरित होणे आवश्यक आहे. या कामांना आचारसंहितेतून वगळण्यात यावे या योजनेअंतर्गत जिल्ह्यात मंजूर झालेली सर्व कामे करण्यास निवडणूक आयोगाने परवानगी द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना केली आहे.
सोलापूर जिल्ह्यात सध्या तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अनेक गावात टॅंकरने पाणी पुरवठा सुरु आहे. ग्रामीण भागातील वाड्यावस्त्यांवरही अनेक ठिकाणी टँकर सुरु आहेत. त्यावर मार्ग काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. मात्र पाण्याशी संबंधित योजना मंजूर असूनही आचारसंहिता असल्याकारणाने कामे करण्यास मर्यादा येत असल्याचे बोलले जात आहे. नागरिकांच्या दृष्टीने महत्वाची असलेली कामे करण्यास परवानगी देणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी फेब्रुवारीत जिल्हा वार्षिक योजना ग्रामीण भागातील वस्त्यांमध्ये पाणी पुरवठा योजनांतर्गत १७, जिल्हा वार्षिक आदिवासी उपाययोजनाअंतर्गत ७ व अनुसूचित जाती उपाय योजना अंतर्गत जिल्ह्यातील ४२ गावात हातपंपावर सौरऊर्जावर आधारित दुहेरी लघु नळ पाणी पुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता दिली होती. मात्र त्यानंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे ही कामे करण्यास अडचणीचे येत असल्याचे सांगितले जात आहे.
टंचाईवर मार्ग काढण्यासाठी ‘सीईओ’ मनीषा आव्हाळे चढल्या करमाळा तालुक्यातील पाण्याच्या टाकीवर
जिल्ह्यात लोकप्रतिनिधींनी केलेल्या शिफारशीनुसार पाणी पुरवठा व टंचाईच्या पार्शवभूमीवर असलेल्या कामांना आचारसंहितेत शिथिलता देऊन ही कामे मार्गी लागावीत, अशी मागणी बागल यांनी केली आहे.