करमाळा (अशोक मुरूमकर) : प्रा. रामदास झोळ यांच्या विनंतीवरूनच आम्ही राजुरी येथील गोविंदपर्व या कारखान्याला गाळपासाठी ऊस दिला होता. त्यामुळे आठ दिवसात त्यांनी जबाबदारी घेऊन आमची थकीत रक्कम व्याजासह द्यावी; अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा शेतकऱ्यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. याबाबत त्यांनी आज (शुक्रवार) तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. निवासी नायब तहसीलदार विजयकुमार लोकरे यांनी त्यांचे निवेदन स्वीकारले.
करमाळा तालुक्यातील राजुरी येथील बंद अवस्थेत असलेल्या गोविंद पर्वबाबत ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलच्या वृत्तानंतर थकीत ऊसबिलासाठी पुढे येऊ लागले आहेत. या कारखान्याचे लालासाहेब जगताप यांनी खुलासा करत ‘थकीत ऊस बिलाचा आणि प्रा. रामदास झोळ यांचा काहीही संबंध नाही. कारखान्याकडे शेतकऱ्यांचे राहिलेले पैसे दिले जातील’, असे म्हटले होते. त्यानंतरही शेतकऱ्यांनी पुढे होऊन पैसे मिळावेत म्हणून आंदोलनाचा इशारा दिला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रा. झोळ यांच्यावर राजकीय दृष्ट्या आरोप केले जात असल्याचे जगताप यांनी म्हटले होते, त्यालाही शेतकऱ्यांनी उत्तर दिले आहे.
या निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले आहे की, ‘२०१८- १९ या गाळप हंगामात आम्ही गोविंद पर्व या कारखान्याला ऊस दिला. प्रा. झोळ यांच्या विनंतीवरून हा ऊस दिला होता. परंतु या कारखान्याने एफआरपीप्रमाणे पैसे दिले नाहीत. काही शेतकऱ्यांना १५०० रुपये टनाप्रमाणे पैसे मिळाले आहेत. मात्र राहिलेले पैसे कधी दिले जाणार? हे पैसे मिळावेत म्हणून आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. राजुरी येथे व प्रा. झोळ यांच्या भिगवण येथील दत्तकला शिक्षण संस्थेवरही जाऊन पाठपुरावा केला आहे. तरीही बिल मिळालेले नाही.’ उगाच याचा राजकीय संबंध जोडू नये. आमचे थकीत पैसे व्याजासह मिळावेत, अन्यथा आंदोलन केले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
पोलखोल भाग ५ : ‘विधानसभेसाठी प्रा. झोळ यांना शुभेच्छा.. पण आतापर्यंत गोविंदपर्वबाबत तुम्ही एकदाही का आंदोलन केले नाही’
या निवेदनावर नंदकुमार दळवी, धनंजय कांबळे, शिवाजी कुंभार, शरद पवार, सचिन सरडे, काकासाहेब सरडे, महादेव सरडे, रामदास शेंडगे, जनार्दन बिबे आदींच्या सह्या आहेत. ज्या शेतकऱ्यांचे ऊस बिल राहिले आहे त्यांनीही आमच्याशी संपर्क साधावा, असे कांबळे यांनी म्हटले आहे. (प्रा. झोळ यांनी अद्यापही स्पष्टीकरण दिलेले नाही. ते जेव्हा भूमिका मांडतील तेव्हा त्यांचे संपूर्ण म्हणणे ‘काय सांगता’ प्रसिद्ध करणार आहे. मात्र ते कधी भूमिका मांडणार आहेत. याकडे सर्वांचे लक्ष आहे.) क्रमशः