करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कोर्टी येथे पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता एस. एम. सांगळे व कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यु. डी. धायगुडे यांनी आज (रविवारी) पोंधवडी चारीची पाहणी केली. तेव्हा हुलगेवाडी ते शितोळे वस्तीकडे जाणाऱ्या चारीची लांबी वाढवून तेथील ओढ्यात सोडल्यास परिसरात विहीरी व बोअरचे पाणी वाढून दिलासा मिळेल, अशी मागणी केली. त्यावर त्वरित प्रस्ताव पाठवू, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना दिले आहे.
अधीक्षक अभियंता सांगळे यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधला. सेवानिवृत्त कृषी अधिकारी निळकंठ अभंग म्हणाले, आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नाने पोंधवडी चारीचे काम पूर्ण झाले. त्यामुळे कोर्टीसह परिसरामध्ये शेतकऱ्यांना पाणी पाहायला मिळाले आहे. आता चाचणीसाठी आलेले पाणी भविष्यातही रोटेशनप्रमाणे मिळावे. चाऱ्यांचे अस्तरीकरण व्हावे, काही उपचारी यांची कामे अपुरी आहेत, काही चाऱ्या झाडाझुडुपांनी, मातीने बुजलेल्या आहेत. त्याच्या दुरूस्त्या व्हाव्यात, अशी मागणी करतानाच ते म्हणाले, कोर्टी परिसरात पाणी मिळत असले तरी वनविभागाच्या अडचणींमुळे गोरेवाडी ते कोर्टी गावठाण लगत जाणाऱ्या ओढ्याच्या पश्चिम भागाला पाणी मिळत नसल्याने ते क्षेत्र वंचित राहत आहे. यावेळी कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता धायगुडे, उपअभियंता शिंदे, शाखा अभियंता श्रीरंग मेहेर, सुभाष अभंग, शिवाजी गावडे, रूपचंद गावडे, दादा गावडे, विकास गावडे, हगारे उपस्थित होते.