करमाळा (सोलापूर) : करमाळा शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी 87 कोटी व रस्ते विकाससाठी 72 कोटीच्या विकास आराखड्यास तांत्रिक मान्यता मिळाली असून पुढील प्रशासकीय मान्यता व निधी मागणीसाठी प्रस्ताव मंत्रालयात दाखल केला असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली आहे.
आमदार शिंदे म्हणाले, यावर्षीच्या दुष्काळाने उजनी धरण वजा झाले. पाण्याचा साठा व कालबाहय झालेली करमाळा शहराची अस्तित्वातील पाणीपुरवठा योजना यामुळे या उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर झाला होता. तसेच करमाळा शहाराच्या लगतचा विस्तारीत परिसरात आवश्यक पाणी पुरवठा सुविधा नव्हत्या. अशी सर्व परिस्थीती लक्षात घेता करमाळा नगरपालिकेच्या वतीने करमाळा शहरासाठी व शहरा लगतच्या वाढता विस्तारीत परिसराकरीता अमृत 2.0 महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत सहभाग घेऊन सुधारीत प्रस्तावित पाणी पुरवठा योजनेचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे सुचना मुख्याधिकारी यांना दिल्या होत्या. तसेच करमाळा शहरांतर्गत सर्व रस्त्यांचा विकास आराखडा तयार करण्यात आलेला आहे.
दुष्काळातसुध्दा सुरळीत पाणी पुरवठा करमाळा शहरासाठी व्हावा यासाठी जॅकवेल, पाणी साठवण टाकी, वितरण व्यवस्था व इत्तर उपकामे समाविष्ट करण्याचे सुचित केले होते. त्यान्वये करमाळा नगरपालकेने या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांची नेमणुक करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे तांत्रिक मान्यतेसाठी सादर केला व त्यान्वये मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक कार्यालय पुणे यांमार्फत 87 कोटी 52 लाख रकमेच्या सुधारीत पाणी पुरवठा कामास तांत्रिक मान्यता प्राप्त झाली आहे.
या योजनेतुन करमाळा शहरातील सर्व परिसराला पुढील 30 वर्षाकरीता अदयावत वितरण व्यवस्थेमार्फत रोज पाणी मिळणारच आहे व पण त्याचबरोबर भिगवण रोड कडील शहरा लगतच्या विस्तारीत परिसर मुथ्या नगर, बागवान नगर, फिरंगाई नगर, माने व बोकन प्लॉटींग, तुकाराम नगरपर्यंत तर कर्जत रोड कडील जिजाऊ प्लॉटींगपर्यंत तर हिवरवाडी रोडकडील गुगळे प्लॉटींगपर्यंत तर पोथरे रोड कडील जामखेड चौक, दिप नगर, सावंत, जाधव, दगडे प्लॉटींग इंदुलकर, यादव यांच्या घरापर्यंत तर तसेच नगर बायपास रोड कडील माजी आमदार जयंतराव जगताप कॉलनी, मथुरा नगर, 72 बंगले, कमलाई नगर, एस. टी. कॉलनी, बाजीराव नगर, सिंचन नगर, करमाळा स्मार्ट सिटी परिसर, घुमरे प्लॉटींग, राजयोग हॉटेल परिसर अशा सर्व लगतच्या विस्तारीत परिसरात नागरिकांना देखील या योजनेतुन वितरण व्यवस्थेमार्फत मुबलक पाणी पुरवठा होणार आहे.
प्रशासकीय संकुलासाठी 40 कोटी निधीची मागणी
करमाळा शहराच्या सर्व प्रशासकीय इमारती कालबाह्य झालेल्या आहेत. सर्वच प्रशासकीय विभाग एकाच प्रशासकीय संकुलात आणण्याच्या दृष्टीने आपण 40 कोटी निधीची मागणी केलेली असून या निधीमधून एकाच प्रशासकीय इमारतीमध्ये तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, भुमिअभिलेख कार्यालय व इतर कार्यालये चालवली जातील. चालू अधिवेशनामध्ये या कामासाठी निधी मंजूर होईल, असा विश्वास आमदार शिंदे यांनी व्यक्त केला आहे.