करमाळा (अशोक मुरूमकर) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी व जालना जिल्ह्यात झालेल्या लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी करमाळ्यात आज (बुधवारी) भव्य मराठा मोर्चा काढण्यात आला. दरम्यान संपूर्ण करमाळा शहरही बंद ठेवण्यात आले होते. पोथरे नाका ते तहसील कार्यालय दरम्यान झालेल्या या मोर्चात हजारोंच्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते. भगवे झेंडे, डोक्यावर भगवी टोपी, आणि हातातील मागण्यांचे फलक सर्वांचे लक्षवेधत होते. या मोर्चात महिला आणि चिमुकल्यांची संख्या लक्षणीय होती. तालुक्यातून अनेक समाज बांधवांनी एकत्र येऊन या मोर्चात सहभाग घेतला. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत करमाळ्यात कोणत्याच मंत्र्यांना प्रवेश नसेल अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
करमाळा शहरातील पोथरे नाका येथील महात्मा गांधी पुतळ्यापासून सव्वा अकराच्या सुमारास हा मोर्चा निघाला. मेन रोडने जय महाराष्ट्र चौकातून हा मोर्चा श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सुभाष चौकातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून गायकवाड चौकातून तहसील कार्यालय येथे हा मोर्चा धडकला. तेथे पंचायत समिती समोरील मैदानात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पाच मुलींनी मनोगत व्यक्त केले. मोर्चाकरांचे निवेदन प्रांताधिकारी प्रियंका अंबेकर यांनी स्वीकारले. यावेळी पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे उपस्थित होते. राष्ट्रगीताने या मोर्चाचा समारोप झाला. करमाळा येथे काढण्यात आलेल्या मोर्चावेळी संतप्त आदोलकांनी निवेदनाबरोबर सरकारला बांगड्याचा आहेर दिला आहे. सकल मराठा समाज. मराठा क्रांती मोर्चा व बहुजन समाज करमाळा शहर व तालुका यांच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चात तालुक्यातील सर्व संघटना, असोसिएशन व राजकीय नेते मंडळींनी पाठींबा दिला होता.
दोन रुग्णवाहिका, एक अग्निशमन दलाची गाडी
मोर्चात सहभागी झालेल्या समाज बांधवांची संख्या मोठी होती. अतिदक्षता म्हणून या मोर्चात दोन रुग्णवाहिका ठेवण्यात आल्या होत्या. मोर्चाच्या पुढे व मोर्चाच्या मागे या रुग्णवाहिका होत्या. याबरोबर तहसील कार्यालय परिसरात एक अग्निशमन दलाची गाडी तैनात होती.
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
मोर्चात सहभागी होण्यासाठी सकाळपासूनच अनेक समाज बांधव पोथरे नाका परिसरात येत होते. मात्र ‘बंद’ असल्याने सर्व दुकाने बंद होती. त्यात मोर्चेकरांची गैरसोय होऊ नये म्हणून तहसील कार्यालय व पोथरे नाका येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
मोर्चा झाल्याबरोबर स्वच्छता
तहसील कार्यालय परिसरात निवेदन दिल्यानंतर मोर्चाचा समारोप झाला. हा समारोप झाल्याबरोबर स्वयंसेवकांनी तेथे पडलेल्या पाण्याच्या बाटल्या उचलून स्वच्छता केली.
‘हे’ होते फलक आणि घोषणा
‘एक मराठा, लाख मराठा’, ‘मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे’, ‘कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’, ‘तुमचे आमचे नाते काय, जय जिजाऊ- जय शिवराय’, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचा फोटो असलेल्या फलकावर जाहीर निषेध जाहीर निषेध’, ‘आता एकच मिशन ओबीसीमधूनच मराठा आरक्षण’, ‘जालना जिल्ह्यात लाठीहल्ल्यात जखमी झालेल्या बांधवांचे फलक’, ‘हरामखोर सरकारचे करायचे काय’, ‘कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण द्या’,
‘या’ आहेत प्रमुख मागण्या
- जालना जिल्ह्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनात झालेल्या लाठीचार्जचा निषेध
- जालना जिल्ह्यात झालेला लाठीचार्ज कोणाच्या आदेशाने झाला ते जाहीर करा व याची चौकशी करा
- जालना जिल्ह्यातील लाठीचार्जला जबाबदार असलेल्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा
- मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे तात्काळ रद्द करा
- मराठा समाजाला ५० टक्केच्या आत ओबीसीमधून आरक्षण मिळावे
- माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरुद्ध आंदोलन केले म्हणून दाखल झालेले करमाळा येथील आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्यावेत