मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभाग बनावट औषधे, भेसळयुक्त अन्न, औषधे विक्री दुकाने आदींची नियमित तपासण्या करीत असते. या तपासण्यांमध्ये नियमबाह्य आढळल्यास त्यांना दोषी ठरवून कारवाई करते. यासंदर्भात विभाग करीत असलेल्या कारवायांमध्ये समानता आणावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी आज दिले.
मंत्रालयीन दालनात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या विविध विषयांबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी आढावा घेताना मंत्री राठोड बोलत होते. बैठकीला विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, आयुक्त अभिमन्यू काळे, उपसचिव श्रीमती सुळे, अवर सचिव महाजन आदी उपस्थित होते.
पाण्याच्या जारबाबत अधिसूचनेची कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना देत मंत्री राठोड म्हणाले की, पाण्याच्या जारला परवाना बंधनकारक करण्यासाठी कायद्यात बदल करणे आवश्यक आहे. याबाबत अधिसूचना काढण्यात यावी. अधिसूचनेचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाला मान्यतेसाठी पाठविण्यात यावा. ज्याप्रमाणे अवैध लाकूड वाहतूक करणारे वाहन जप्त करण्यात येते, त्याप्रमाणे वन विभागाच्या धर्तीवर गुटखा वाहतूक करणारे वाहनही जप्त करावे. यासाठी कायद्यात बदल आवश्यक आहे. याबाबतही अधिसूचना काढण्याची कार्यवाही पूर्ण करावी.
मंत्री राठोड म्हणाले की, विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी प्रतिनियुक्तीचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे. याबाबत प्राप्त प्रस्तावांची तातडीने छाननी करून प्रस्ताव सादर करावा. प्रतिनियुक्तीवर कुठलीही खाजगी व्यक्ती घेवू नये. आलेल्या प्रस्तावांमधून प्रतिनियुक्ती देण्यात यावी. तसेच विभागांतर्गत अतिरिक्त कार्यभार देण्याबाबत एकसूत्रता असावी. याबाबत एकसूत्री धोरण आणावे.
सौंदर्य प्रसाधनांच्या उत्पादकांची तपासणी वाढविण्याच्या सूचना करीत मंत्री राठोड म्हणाले, की सौंदर्य प्रसाधने उत्पादकांच्या तपासण्यांचे प्रमाण कमी आहे. हे प्रमाण वाढवावे. कुठल्याही तपासण्या योग्य रितीने झाल्या पाहिजे. गुटखा विक्री, वाहतूकमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाचेच अधिकारी, कर्मचारी आढळल्यास कठोर कारवाई करावी. कुणालाही पाठिशी घालू नये. बनावट दूध व तेलाच्या प्रकरणांत सहआयुक्त स्तरावर तातडीने समिती गठित करावी. समितीचा अहवाल शासनास सादर करावा. बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती दिली.