करमाळा (अशोक मुरूमकर) : महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची करमाळ्यात सभा होणार आहे. या सभेचे ठिकाण निश्चित झाले असून करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोरील मैदानावर ही सभा असणार आहे. माजी आमदार नारायण पाटील हे या सभेवेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार मोहिते पाटील व महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात खरी लढत आहे. वंचितचे रमेश बारस्कर हे देखील येथे उमेदवार आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून सध्या जोरदार सभांचे नियोजन केले जात आहे. सोमवारपासून या सभांचा धडाका सुरु होत आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी (शरद पवार), काँग्रेस, शिवसेना (ठाकरे), आप यांच्यासह त्यांचे मित्र पक्षाचे पदाधिकारी व माजी आमदार नारायण पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी (ता. २२) करमाळा तालुक्यात दौरा होणार आहे.
मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये बंड करून महाविकास आघाडीत प्रवेश केल्याने माढ्यातील निवडणुकीत रंगत आली आहे. या मतदारसंघात शरद पवार यांच्या सहा सभा होणार आहेत. बुधवारी (ता. २४) सकाळी १० वाजता मोडनिंब येथे, शुक्रवारी (ता. २६) सकाळी १० वाजता करमाळा येथे कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील मैदान व सांगोला येथे दुपारी २ वाजता, शनिवारी (ता. २७) सकाळी १० वाजता दहिवडी येथे, मंगळवारी (ता. ३०) सकाळी १० वाजता फलठण व २ मे रोजी सकाळी १० वाजता अकलूज येथे सभा होणार आहेत.
– Karmala Politics माढा लोकसभा निवडणुक ही शिंदे परिवार विरुद्ध मोहिते पाटील अशी नाही?
– चर्चा तर होणारच! अचानक पत्रकार परिषद का रद्द झाली?