करमाळा (अशोक मुरूमकर) : उजनी धरणात भीमा नदीच्या पात्रात वादळी वाऱ्याने बोट उलटल्याची घटना घडल्यापासून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या बोटीतील बेपत्ता झालेल्या सहा प्रवाशांचा शोध सुरु आहे. या घटनेनी जुना घडलेल्या दुर्दैवी बोटी बुडालेल्या घटनांच्या आठवणी ताज्या झाल्या असून या घटनांना जबाबदार कोण आहे? अशा घटनांतून आणखी किती बळी जाणार आहेत? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
उजनी धरणाच्या बॅक्वॉटर भागात असलेल्या गावांसाठी दोन्ही बाजूच्या नागरिकांना ये- जा करता यावी म्हणून अनेक दिवसांपासून पुलाची मागणी आहे. मात्र हा पूल होत नाही. आता पुलाला मंजुरी मिळाली असल्याचे सांगितले जात असले तरी आतापर्यंत जीवघेण्या प्रवासात बळी गेलेल्या निष्पाप व्यक्तीच्या मृत्यूस कोण जबाबदार आहे? असा प्रश्न केला जाऊ लागला आहे.
उजनी धरणात यापूर्वीही बोटी उलटल्या आहेत. मात्र त्यानंतरही यावर काय उपाय योजना झाल्या का? हा प्रश्न केला जात असून यापूर्वी झालेल्या घटनांच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. आता तरी प्रशासन काय खबरदारी घेणार का? असा प्रश्नही केला जात आहे.
इंदापूर व करमाळा तालुक्याला जोडण्यासाठी पूल महत्वाचा आहे. हा पूल नसल्याने नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. हा प्रवास केला नाही तर ५० ते ६० किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. त्यात वेळ जातो आणि पैसाही खर्च होतो आहे. शिवाय शेतमालाची विक्री करण्यासाठीही वाहतूक लांबची पडते. यामुळेही नुकसान होत आहे. जीवघेणे प्रवासात जीवही जात असल्याचे समोर येऊ लागले आहे.
उजनीच्या पाण्यातून ‘या’ ठिकाणावरून सुरु असतो बोटीने जीवघेणा प्रवास
उजनी धरण परिसरात भीमा नदीच्या पात्रात प्रवासी यांत्रिक बोट उलटलेली मंगळवारी (ता. २१ मे २०२४) झालेली ही पहिलीच घटना आहे. मात्र यापूर्वी सध्या बोटी उलटल्या होत्या, अशी चर्चा आहे. यापूर्वी एका लग्नाला झरे येथील वऱ्हाड बोटीने निघाले होते. तेव्हा त्यांची बोट उलटली होती. मात्र त्यात जीवितहानी झाली नव्हती, असे सांगितले जात आहे. तेव्हा नदीच्या काटावर झरे येतुन सर्व वऱ्हाडी ट्रॅक्टरने आले होते. आणि पुढे लग्नला बोटीने गेले होते. मात्र संपुर्ण वऱ्हाडच घेऊन गेलेली बोट उलटली होती. साधणार १९८९ ला ही घटना झाली होती. तेव्हा पाणी जास्त नव्हते. त्यामुळे त्यात जीवितहानी झाली नव्हती, असे सांगितले जात आहे.
याशिवाय दोन वर्षपूर्वी वांगी येथे फिरायला आलेले पर्यटकांची बोट उलटली होती. त्यातही जीवितहानी झाली होती. अकलूज येथील काही डॉक्टर उजनी काटी फिरायला आले होते, तेव्हाही असाच प्रकार झाला होता. तेव्हा एका प्रसिद्ध डॉक्टरचा मृत्यू झाला होता. सोगावलाही एक साधी बोट उलटली होती, अशी दुर्दैवी आठवणी सांगितली जात आहे.
ज्येष्ठ पत्रकार विवेक येवले यांच्या माहितीनुसार, १९९० ला टाकळी- कात्रज परिसरात एक बोट उलटली होती. यामध्ये १०-१५ जणांचा मृत्यू झाला होता. त्याचे वृत्त त्यांनी ‘संचार’, ‘केसरी’, ‘प्रभात’ला त्यांनी दिले होते.
ऑईल पाण्यावर आल्याने वाऱ्याने उलटलेली बोट सापडली! २४ तासानंतरही उजनीत बेपत्ता झालेल्या सहा व्यक्तींचा शोध सुरूच
पत्रकार येवले यांनी अशा वारंवार घडणाऱ्या घटनांवर नाराजीही व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ‘हा सगळा प्रशासनाचा गलथानपणा व बेपर्वाई आहे. ज्याप्रमाणे रस्त्यावरून खुलेआम बेकायदेशीर प्रवासी वाहतूक ‘अर्थ’पूर्ण पद्धतीने सुरू असते तसाच हा प्रकार आहे, असे म्हणावे लागेल. गेली अनेक वर्षे उजनी जलाशयात प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटींकडे आवश्यक परवाने आहेत का? ते क्षमतेनुसार वाहतूक करतात का? या बोटी तंदुरुस्त आहेत का? याची तपासणी कोणत्या यंत्रणेकडून केली जाते? यासाठी काही नियमावली आहे का? दैनंदिन सुरू असलेल्या या वाहतुकीसंदर्भात प्रवाशांच्या सुरक्षिततेसंदर्भात प्रशासनाने काय उपाययोजना केलेल्या आहेत? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने समोर आले आहेत. अशी एखादी घटना घडली की तेव्हढ्यापुरती ढिम्म, बधिर प्रशासनाला जाग येते. काही काळानंतर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न! आंधळं दळत आणि कुत्र पीठ खातं…असं जे म्हणतात ते यालाचं!, असे म्हणत रोष व्यक्त केला आहे.