करमाळा (सोलापूर) : माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्यावर बार्शी येथे एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. तेथून घरी परतल्यानंतर नागरिकांना ते भेटणार आहेत. तोपर्यंत कोणीही रुग्णालयात गर्दी करू नये, असे आवाहन जगताप गटाकडून करण्यात आले आहे.
माजी आमदार जगताप यांना (गुरुवारी) सांयकाळी त्रास होऊ लागला. त्यानंतर करमाळा येथील एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. तेथून त्यांना बार्शी येथे दाखल केले आहे. त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत. ‘आपल्या सर्वांच्या आशिर्वादामुळे माझ्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असून डॉक्टरांनी आराम करण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. ज्यांना याबाबत समजले आहे, त्यांनी भेटायला येण्यास सुरुवात केली आहे. मोबाईलवरही तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी फोन येत आहेत. आज (शुक्रवारी) दिवसभर आमदार राजेंद्र राऊत, आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार नारायण पाटील यांच्यासह अनेकांनी येऊन भेट घेतली आहे. येथे अनेकांची गर्दी झाली होती. आपले प्रेम, आपुलकी व जिव्हाळा मी समजू शकतो. लवकरच मी बरा होवून आपल्या सेवेसाठी हजर होईन. कृपया मी निवासस्थानी आल्यानंतर आपण भेटावे’, असे माजी आमदार जगताप यांनी स्वतः सांगितले आहे.