करमाळा (अशोक मुरूमकर) : लाभ मिळवून देतो म्हणत बांधकाम कामगारांची नोंदणी करणारी टोळी सक्रिय झाली असल्याचे अनेकदा समोर आले होते. दीड ते दोन हजार रुपये घेऊन ठेकेदार व स्वयंघोषित एजंट यांनी काही दिवसांपासून अक्षरशः कमी वेळेत जास्त पैसे कमवण्याचा गोरख धंदा सुरु केला आहे. मात्र राज्य सरकारच्या कामगार आयुक्त कार्यालयाने या कामगारांची पडताळणी सुरु केली असून बांधकाम कामगार असल्याचे दाखले देणाऱ्या संशयित ठेकेदारांना नोटीसा पाठवून अहवाल मागितला आहे. यामध्ये करमाळ्यातील २६ जण असल्याची माहिती आहे. यामुळे बोगस बांधकाम कामगारांची नोंद करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
नोंदणीकृत बंधाकाम कामगारांना सरकार विविध लाभ देते. त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक सुविधाही दिल्या जातात. त्यासाठी अनेकजण बोगस नोंदी करत आहेत. यातून बोगस कामगार, एजंट व ठेकेदार यांच्या टोळ्या सक्रिय झाल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. याची कामगार आयुक्तांनी दखल घेतली असून ठेकेदारांची चौकशी सुरु झाली आहे.
सोलापूर येथील सहाय्यक कामगार आयुक्त एन. एल. येलगुंडे यांनी ठेकेदारांना नोटीसा पाठवल्या आहेत. त्यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ येथे नोंदणीसाठी नियोक्ता म्हणून बांधकाम कामगारांना देण्यात आलेल्या प्रमाणपत्राच्या अनुषंगाने ठेवले जाणारे दप्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या ठेकेदारांनी दप्तर दिलेले नाही. त्यांच्याकडील कामगार नोंदणी रद्द करण्यात आली आहे.
बांधकाम कामगार नोंदणीसाठी ९० दिवसांपेक्षा जास्त दिवस काम केल्याचे लेखी प्रमाणपत्र ठेकेदार देतात. मात्र काही ठिकाणी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कामगार नसतानाही हितसंबंधातून प्रमाणपत्रे दिली जातात. यातून काही एजंटांनी तर अक्षरशः धुमाकूळ घातला असून गावागावात जाऊन पैसे घेऊन अनेकांची नोंदणी केली. यात खरे लाभार्थी बाजूला राहिल्याचा आरोप होतहोता. आता कामगार आयुक्त कार्यालयाने नोटीसा दिल्या असल्या तरी खरे कामगार व चांगल्या ठेकेदारांवर कारवाई होऊ नये अशी भावना कामगारांची आहे. यामध्ये एजंटावरही चाप बसने आवश्यक आहे.
