करमाळा (सोलापूर) : मराठा आरक्षणासाठी ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा देणारे आरपीआयचे यशपाल कांबळे यांच्या अभिनंदनाचा ठराव करत सकल मराठा समाजाच्या भूमिकेला देवळाली येथील बहूजन ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सर्व राजकीय नेत्यांना प्रवेश दिला जाणार नाही, अशी शपथही नागनाथ मंदिरात आयोजित बैठकीत घेण्यात आली.
यावेळी उपस्थित बहुसंख्य बहुजन बांधवांनी पाठिंबा दर्शविला. याचे निवेदन तहसिलदार व पोलिस प्रशासनालाही देण्यात आले आहे. यावेळी रोशेवाडी ग्रामपंचायत सदस्य व आरपीआयचे युवा जिल्हाध्यक्ष यशपाल कांबळे यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदाच मराठा आरक्षणासाठी आपल्या ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या मराठा समाजाप्रतीच्या आपूलकि व बांधिलकीमुळे सकल मराठा समाज देवळाली यांचे वतीने त्यांच्या अभिनंदनाचा विशेष ठराव घेण्यात आला.