करमाळा (सोलापूर) : बिटरगाव श्री व पांडुंरग वस्ती येथे पिण्याच्या पाण्याचे नियोजन करा, अशी मागणी ग्रामपंचायतीचे सदस्य चत्रभुज मुरूमकर यांनी केली आहे. योग्य नियोजन होत नसल्याने येथे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे. बिटरगाव श्री परिसरात काही ठिकाणी पाणी आहे मात्र ते पाणी पिण्यालायक नाही. त्यामुळे काहीजण विकतचे पाणी घेत आहेत.
बिटरगाव श्री येथे सध्या पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पांडुरंग वस्ती येथे पाण्यासाठी सार्वजनिक बोअर आहे. मात्र त्याच्या मुख्य जलवाहिनीलाच अनधिकृतपणे नळ जोडले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. तर बिटरगाव श्री येथेही सध्या तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. येथेही पाण्याचे नियोजन केले जात नाही त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. पाणी असूनही नियोजन आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथे पाणी टंचाई होत आहे.
पाटील म्हणाले, पाणी टंचाई दूर करण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. मात्र जे पाणी आहे त्यांचे नियोजन करणे आवश्यक आहे. बिटरगाव श्री फाट्यावरील सार्वजनिक बोअरमध्ये काही दिवसांपूर्वी अज्ञातानी दगड टाकून बुजला होता. त्याला पाणीही चांगले लागले होते. बोअर अधिग्रहण करणे किंवा इतर उपाय योजना करण्यापेक्षा तोच बोअर घेऊन पाणी पुरवठा करण्यात यावा.
गटविकास अधिकारी मनोज राऊत म्हणाले, टंचाईच्या काळात कोणीही कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करू नये, बोअरमध्ये दगड टाकला असेल किंवा मुख्य जलवाहिनीला कोणी बेकायदा नळ जोडले असतील तर ते त्वरित काढून घेण्याबाबत सूचना दिल्या जातील, अन्यथा कारवाई केली जाईल.