करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा शहर व परिसरात सतत अपघात होत आहेत. त्यात आवाटी ते कोर्टी या रस्त्याचे काम प्रगतीपथावर असल्याने या रस्त्यावर त्याचे प्रमाण अधिक आहे. असे असताना यावर उपाय योजना करण्याचे सोडून सार्वजनिक बांधकाम विभाग जून अपघाताला निमंत्रणच देत असल्याचे चित्र आहे. याचे उदाहरण म्हणजे करमाळा शहरातील श्रीदेवीचामाळ रोवडरील ठेकेदाराचा पराक्रम!
करमाळा शहरातून श्रीदेवीचामाळ रस्त्यावर सध्या डांबरीकरण झाले आहे. हा रस्ता रुंद झाला आहे. हे काम करताना ठेकेदाराने निष्काळजीपणा केला आहे. असे असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे लक्ष देत नाही का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या रस्त्यावर श्रीराम फायनान्सच्या कार्यालयासमोर वीजवितरण कंपनीच्या एका खांबाचा ताण भर रस्त्यात आला आहे. तरीही ठेकेदाराने येथे डांबरीकरण केले आहे.
हा खांब सध्या गटारीत गेला आहे. तो खांब पडू नये म्हणून त्याला जो तारेचा ताण दिलेला आहे. भर रस्त्यात आला आहे. रात्री व दिवसाही भरधाव वेगात आलेल्या गाडी याला धडकू शकते. हा ताण चालकाच्या लक्षातही येत नाही. त्याला धडकल्यास जीवितहानीही होऊ शकते. याकडे गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे.
रस्त्यावरील खांब दुसऱ्या जागी हलवणे ही जबाबदारी संबंधित ठेकेदारकडे असते, असे सांगितले जात आहे. मात्र हे काम करताना खांब का हलवला नाही किंवा ताण का काढला नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. वीज वितरण कंपनीचे शाखाधिकारी शिंदे म्हणाले, या धोकादायक खांबाबत संबंधित ठेकेदाराला माहिती दिलेली आहे. त्याने त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे. मात्र अपघात होऊ नये म्हणून तेथे व्यवस्था केली पाहिजे याबाबत संबंधिताना कळवले जाईल. याबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता के. एम. उबाळे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.