करमाळा (सोलापूर) : गेल्या काही दिवसात नगर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सिना नदीला पाणी आले आहे. खडकी बंधाऱ्यातून हे पाणी आले असून तरटगाव बंधाऱ्यात हे पाणी येताच शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करत आज (शनिवारी) हे पाणी पाहण्यासाठी गर्दी केली होती. यावर्षी पाऊस लांबल्याने पाणी येणार की नाही अशी स्थितीत होती मात्र पावसाळा संपत असताना झालेल्या पावसाने हे पाणी आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
तरटगाव बंधाऱ्यावर हे पाणी पाहण्यासाठी आदिनाथचे माजी संचालक डॉ. हरीदास केवारे, आदिनाथचे माजी अध्यक्ष संतोष पाटील, रंगनाथ काळे, किरण वाळूंजकर, हरीदास मोरे, सुदाम पाटील, धनंजय मोरे, अवधूत घाडगे, बिटरगाव ग्रामपंचायतीच्या सदस्या आशा मुरूमकर यांच्यासह आळजापूर, तरटगाव व बिटरगाव श्री येथील शेतकऱ्यांनी येथे प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली आहे. बंधाऱ्यात पाणी येताच तरटगाव ग्रामपंचयतीच्या सदस्या ज्योती मोरे, प्रयागा मोरे, नंदाबाई जाधव, प्रमिला मोरे व लत्ता मोरे आदींनी पाण्याचे पूजन केले.