करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील मारवाड गल्लीत झालेल्या चोरीप्रकरणात चौघांना करमाळा पोलिसांनी अटक केली होती. करमाळा डीबी पथकाने ही कारवाई केली. संशयित आरोपींकडून साडेतीन तोळे सोने असा १ लाख ४० हजाराचा मुद्देमाल संशयित आरोपींकडून जप्त करण्यात आला आहे.
करण अंबादास खरात (वय २४, रा. सिद्धार्थनगर, करमाळा), सुशील नामदेव गायकवाड (वय २४, रा. मुठ्ठनगर, करमाळा), गणेश पांडुरंग शिंदे (वय १८, रा. कामोणे, ता. करमाळा) व अल्लाताफ महेबूब शेख (वय २४, रा. पांडे, ता. करमाळा) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. संशयित आरोपींनी मारवाड गल्ली येथील फिर्यादी सोमनाथ प्रकाश बरीदे यांच्या घरात २९ नोव्हेंबरला दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास चोरी झाली होती.
फिर्यादी बरीदे हे दुकानाला गेले होते. तेव्हा घराच्या उघड्या दरवाजातून संशयितांनी साडेतीन तोळे सोने (१ लाख ४० हजार) लंपास केला. याचा करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. करमाळा डीबी पथकाने याचा तपास केला. संशयित आरोपींकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांना अटक करून करमाळा न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. तेव्हा त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील, पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार भाऊराव शेळके, पोलिस हवालदार अजित उबाळे, मंगेश पवार, पोलिस नाईक चंद्रकांत ढवळे, निखिल व्यहवारे, पोलिस कॉन्स्टेबल गणेश शिंदे, सोमनाथ जगताप, टॉफीक काझी आदींनी तपास केला.