करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील हिसरे येथील शेतकरी कुटुंबातील नयन पोपट वीर यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत त्यांची ही निवड झाली आहे. त्यांचे वडील शेती करतात तर आई अंगणवाडी शाळेमध्ये मदतनीस आहे.
नयनचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण चिखलठाण येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. बारावीचे शिक्षण वाणिज्य शाखेतून कर्जत येथून झाले व वाणिज्य शाखेची पदवी TC कॉलेज बारामती येथून पूर्ण केली. नयन हा लहानपणापासून मामाच्या गावी होता. तो हुशार व कष्टाळू होता. त्याची आई मंगल वीर या गावातील शाळेमध्ये अंगणवाडी मदतनीस आहेत. त्यांची खूप इच्छा होती की मुलाने शिकून फौजदार व्हावे व त्या प्रेरणेतूनच तो एमपीएससीचा अभ्यास करू लागला. त्याने एमपीएससीचा संपूर्ण अभ्यास कोल्हापूर येथे कोणताही क्लास न लावता केला.
एमपीएससीची तयारी करत असताना त्याच्या आई- वडिलांनी कोरडवाहू शेतीत कष्ट करत त्याला साथ दिली. त्या कष्टाची जाण ठेवून सातत्याने अभ्यास करून नयनने यश मिळवले आहे. त्याच्या यशामध्ये मामा, काका, चुलते, बहीण व दाजी असलेले कृषी पर्यवेक्षक निखिल सरडे यांनी साथ दिली.