करमाळा (सोलापूर) : माढा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी (ता. ७) मतदान होत आहे. या मतदानासाठी करमाळा विधानसभा मतदार संघांतर्गत येणाऱ्या गावातील ३४२ मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन दाखल झाल्या आहेत. या मतदानासाठी आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी चारुशीला देशमुख मोहिते व तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी दिली आहे. दिवेगव्हाण व वाघाचीवाडी ही मतदान केंद्रे संवेदशील असल्याचे ठरवण्यात आली आहेत. निवडणुकीवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ७०० पोलिसांचा बंदोबस्त असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली आहे.
सोमवारी (ता. ६) ईव्हीएम मशीन व इतर साहित्य वाटप करण्यासाठी तहसील परिसरात सकाळपासून कर्मचाऱ्यांची गर्दी झाली होती. ईव्हीएम मशीन देण्यासाठी 38 टेबल ठेवण्यात आले होते. मतदान प्रक्रिया राबवण्यासाठी करमाळा विधानसभा मतदारसंघात बार्शी, माढा, सांगोला व माळशिरस तालुक्यातून कर्मचारी व अधिकारी आले होते.
उन्हाची तीव्रता लक्षात घेता 139 मतदान केंद्रांवर मंडप टाकण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या मंडपामुळे मतदारांना सावलीची व्यवस्था होणार आहे तसेच मतदारांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावरती ज्याच्या माध्यमातून शुद्धपाणी देण्यात येणार आहे, असे तहसिलदार ठोकडे यांनी दिली आहे.
करमाळा विधानसभा मतदारसंघात
3 लाख 17 हजार 928 मतदार आहेत. या मतदारांपैकी १ लाख 66 हजार 813 पुरुष मतदार आहेत. १ लाख 51हजार 114 स्रिया मतदार आहेत. तर १० तृतीयपंथी मतदार आहेत. दोन लाख 77 हजार 880 मतदारांना वोटर स्लिप पोहच करण्यात आली आहे. करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात एक दिव्यांग मतदान केंद्र उभारण्यात आले आहे, तर कोंढारचिंचोली व महात्मा गांधी विद्यालय करमाळा येथे आदर्श मतदान केंद्र उभारण्यात आले असून या ठिकाणी सर्व यंत्रणा महिला राबवणार आहेत. 342 मतदान केंद्र असुन प्रत्येक मतदान केंद्रावर 6 कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
गौंडरे (ता. करमाळा) येथे 100 टक्के मतदान करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली आहे. यासाठी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा. लक्ष्मण राख यासाठी परिश्रम घेत आहेत. येथे 100 टक्के मतदान करण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे स्वयंसेवक व प्राध्यापक यासाठी घरोघरी जाऊन मतदान जनजागृती करत आहेत, असे तहसीलदार ठोकडे यांनी केले.