करमाळा (सोलापूर) : यशवंतराव चव्हाण महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना व ग्रामपंचायत कोर्टी यांच्या वतीने ‘युवकांचा ध्यास… ग्राम व शहर विकास…’ हे ब्रीद घेऊन कोर्टी येथे श्रमसंस्कार शिबीर सुरु आहे. यामध्ये स्वच्छतेचे दूत असणारे आधुनिक गाडगेबाबा फुलचंद नागटिळक यांनी ‘मी गाडगे महाराज बोलतोय’ या विषयावर प्रबोधनपर व्याख्यान दिले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीरंग मेहेर हे होते. फुलचंद नागटिळक हे आधुनिक गाडगे महाराज आहेत. त्यांनी आपल्या प्रबोधनपर व्याख्यानातून कोर्टी गावातील ग्रामस्थांना स्वच्छतेचा संदेश दिला. तसेच गाडगे महाराजांप्रमाणे कोर्टीतील घराघरात जाऊन स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. यावेळी गावातील लहान मुले सुद्धा त्यांच्या ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला ‘या भजनात दंग होऊन गेली होती.प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांची मने त्यांनी स्वच्छ केली.याबरोबरच पर्यावरण संवर्धन काळाची गरज, नारीशक्तीचा सन्मान, शेतकरी वाचवा,मुली वाचवा,मुला मुलीच्या शिक्षणाकडे लक्ष द्या, मुले हीच आपली संपत्ती आहेत, दारू पिऊ नका, रीन काढून सण करू नका,अंधश्रद्धेला मूठ माती द्या याबद्दल प्रबोधन केले. तसेच देव दगडात नसून माणसात आहे हे गाडगेबाबांचे तत्त्वज्ञान लोकांच्या गळी उतरवण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक लक्ष्मण राख यांनी केले तर सूत्रसंचालन सचिन नवले यांनी केले या कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक डी. एस. जाधव यांनी मानले या कार्यक्रमासाठी मकाईचे संचालक आशिष गायकवाड,उपसरपंच नाना झाकणे, भर्तरीनाथ अभंग,राजेंद्र अभंग महाराज,ग्रामपंचायत सदस्य,गावातील ग्रामस्थ,पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. जयंत भांगे प्रा. मुन्नेश जाधव बाबू चव्हाण यांनी परिश्रम घेतले.