सोलापूर : अक्कलकोट रोड व चिंचोली एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग आहेत. त्यांना नियमित वीजपुरवठा होणे आवश्यक आहे. त्यामुळे उद्योजकांचा प्रतिनिधी घेऊन वीज पुरवठा कोठे कोठे खंडित होतो, तसेच रोहित्र व्यवस्थित आहेत का? याबाबत तपासणी करावी. येथील वीज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता महावितरणने घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा उद्योग मित्र समितीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष कोलते, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, महापालिकेचे विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एम. परदेशी, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता ग्रामीण राजेश मदने, एमआयडीसीचे वसुंधरा जाधव, ए. डी. मगर, उद्योजकांचे प्रतिनिधी निलेश शहा, श्रीकांत अंबुरे, राम रेड्डी, रमेश डाकलिया, राजू राठी, रामेश्वरी गायकवाड आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, अक्कलकोट रोड एमआयडीसीमधील उद्योजकांचे वीज खंडित होणे, ट्रीप होणे रोहित्रवर अतिरिक्त भार असणे त्यामुळे मशिनरी खराब होत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्या अनुषंगाने वीज वितरण कंपनीने अक्कलकोट एमआयडीसी उद्योजकांचा प्रतिनिधीसोबत घेऊन तपासणी करावी व सुरळीत वीज पुरवठा करावा. त्याचप्रमाणे एमआयडीसी चिंचोलीमध्ये जी याच पद्धतीने काम करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
अक्कलकोट रोड एमआयडीसी मध्ये रस्ते, स्ट्रीट लाईट पाणीपुरवठा ड्रेनेज व्यवस्था महापालिकेने देणे आवश्यक आहे. परंतु महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने राष्ट्र औद्योगिक विकास संस्थेने ही कामे करावी यासाठी महापालिकेने ना हरकत प्रमाणपत्र दिलेले आहे, त्या अनुषंगाने एमआयडीसीला पत्र पाठवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांना दिले. तसेच महापालिकेने अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरासाठी जिल्हा नियोजन समिती मधून फायर स्टेशन साठी एक कोटी 25 लाखाचा प्रस्ताव सादर केलेला आहे, त्या प्रस्तावाला मान्यता देण्यात येईल. या प्रमाणे फायर स्टेशनसाठी आवश्यक असलेले वाहन खरेदीसाठी जवळपास एक ते दीड कोटीचा निधी आवश्यक असल्याने हा निधी विशेष बाब म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ यांनी उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरात महापालिकेने वेळच्यावेळी कचरा उचलण्यासाठी घंटागाडी पाठवावी. त्याचप्रमाणे दोन्ही एमआयडीसी साठी सोलापूर शहरातून कामगारांना ये जा करण्यासाठी महापालिकेने सिटी बस सेवा उद्योजकाची चर्चा करून त्यांनी ठरवून दिलेल्या वेळेत उपलब्ध करून द्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केल्या. या दोन्हीही एमआयडीसी साठी अंतर्गत रस्ते, स्ट्रीट लईट व ड्रेनेज सिस्टीम साठी कामे सुचवण्यासाठी सुचवणे व प्रस्ताव सादर करण्यासाठी एक समिती गठीत करावी असेही त्यांनी सांगितले. यावेळी अक्कलकोट रोड व चिंचोली एमआयडीसी मधील अनेक उद्योजक बैठकीस उपस्थित होते. त्यांनी त्यांचे उद्योग व एमआयडीसी परिसरातील विविध समस्येच्या अनुषंगाने आपली मते मांडली व त्या समस्या प्रशासनाने सोडवण्याची मागणी केली.
जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष कोलते यांनी जिल्हा उद्योग मित्र समितीच्या मागील इतिवृत्ताची माहिती दिली.तसेच या सभेच्या अनुषंगाने विविध विषयाची मांडणी केली. यावेळी त्यांनी राज्य शासनाने उद्योग भवन मंजूर केले असून रत्नागिरीनंतर सोलापूरला उद्योग भवन उभारण्यास मंजुरी दिल्याची माहिती दिली. तसेच शासनाने सुरू केलेले व नवउद्योगांच्या अडचणी दूर करणारे एक खिडकी या पद्धतीने कार्यरत असणारे मैत्री ॲप विषयी माहिती दिली.