पंढरपुर (सोलापूर) : अनेक वर्षांपासुन आदिवासी कोळी जमातीचा जातीच्या दाखल्यांसाठी संघर्ष सुरु आहे. मात्र राजकीय नेत्यांनी जाणीवपूर्वक संविधानिक हक्कापासून कायमस्वरूपी वंचित ठेवले आहे. आमच्या समाजाचा संविधानिक अधिकार आम्हाला मिळायलाच हवा, यासाठी आमचा नेमका कशा पध्दतीने संविधानिक अधिकार आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्व आमदारांनी हिवाळी अधिवेशनात महादेव कोळी समाजाच्या दाखल्यांचा प्रश्न उपस्थित करुन न्याय द्यावा, असे आवाहन महर्षी वाल्मिकी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केले आहे.
असा आहे आमचा संविधानिक अधिकार
आदिवासी कोळी जमातीमध्ये (1). कोळी महादेव, (2). कोळी मल्हार, (3). कोळी ढोर आणि ( 4 ). सोनकोळी / मच्छिमार कोळी, असे एकूण 4 उपगट आहेत. ज्या मध्ये केवळ समुद्र किनारी राहून वंशपरंपरेने मासेमारीचा व्यवसाय करणार्या सोनकोळी किंवा मच्छिमार कोळीना शासनाने SBC मध्ये समाविष्ट केले आहे परंतु उर्वरित 3 उपगट अनुसूचित जमाती (ST)मध्ये आहेत.
इंग्रज काळातील विविध मानववंश शास्त्रज्ञांचे संशोधनग्रंथ, तसेच सोलापूर जिल्ह्यांचे सन 1884 मधील District Gazetteer, सन 1881 ते 1951 पर्यंतचेCensus Reports, तसेच इतर अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक काळातील दुर्मिळ संदर्भग्रंथ, इत्यादी मधील नोंदीवरून असे सिद्ध होते की, सोलापूर जिल्ह्यामध्ये पौराणिक काळापासूनच कोळी महादेव, कोळी मल्हार आणि कोळी ढोर या सर्व आदिवासी जमाती वास्तव्य करत आहेत. ज्यामध्ये कोळी महादेव कोळी या जमातीची लोकसंख्या सर्वाधिक आहे. महत्वाचे म्हणजे, सोलापूर जिल्हा समुद्र किनारी येत नसल्याकारणाने SBC मधील सोनकोळी किंवा मच्छिमार कोळी यातील एक ही कुटुंब सोलापूर जिल्ह्यामध्ये पौराणिक काळापासूनच वास्तव्य करत नाहीत.
असे असतांनासुद्धा, कोळी समाजाबाबत शासन स्तरावरील प्रचंड गैर- समाजामुळे, अपूर्ण ज्ञानामुळे, तसेच दिशाभूल करणार्या माहितीच्या आधारे, स्वतः शासनाकडून विनाकारण या समाजावर अनेक वर्षापासून प्रचंड अन्याय होत आहे. सदर समाज अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये असतांनासुद्धा या समाजाला जाणीव पूर्वक संविधानिक हक्कापासून कायमस्वरूपी वंचित ठेवण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून, सोलापूर जिल्ह्यातील मा.प्रांताधिकारी तसेच पडताळणी समिती, पुणे कडून वरील सर्व आदिवासी कोळी जमातींना जाणीवपूर्वक अनुसूचित जमातीचे (ST) प्रमाणपत्रे दिले जात नाहीत, किंबहुना अद्याप सोलापूर जिल्ह्यामध्ये कोळी जमातीला एक ही वैधता प्रमाणपत्र देण्यात आलेली नाही. ज्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील ूवरील सर्व जमातींचं प्रचंड नुकसान झाले आहे. या सर्व जमाती आजच्या काळामध्येसुद्धा शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, औद्योगिक, शेती विषयक, असे सर्व बाजूने अप्रगत व मागास राहिलेले आहेत.
मतदार संघामध्ये कोळी समाज बहुसंख्येने वास्तव्य करत आहे, आणि सर्व प्रकारच्या निवडणुकावेळी कोळी समाजाचे मतदान हे नेहमी निर्णायक ठरत असतात, सदर समाज ज्या उमेदवाराच्या बाजूने मतदान करते तो उमेदवार निश्चितपणाने निवडून येत असतो, हा अनेक वर्षाचा अनुभव आहे. तरी, सदर मतदार संघाचे आपण सर्व विद्यमान आमदार यांना सोलापूर जिल्ह्यातील तमाम कोळी समाजाच्या वतीने विनंती करण्यात येते की, कोळी समाजावर वर्षानु-वर्षे होत असलेल्या अन्यायाबाबत शासन दरबारी कथन करण्यासाठी, तसेच कोळी महादेव, कोळी मल्हार आणि कोळी ढोर या सर्व आदिवासी जमाती पौराणिक काळापासूनच सोलापूर जिल्ह्यामध्ये वास्तव्य करत असून सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक कोळी केवळ अनुसूचित जमाती (ST) मधीलच कोळी आहे, या बाबतचे ठोस पुरावे शासन दरबारी सादर करण्यासाठी, तसेच सोलापूर जिल्ह्यातील कोळी समजाबाबत संबंधित अधिकार्यांच्या मनातील पूर्वग्रहदुषित विचार आणि विविध शंकांचे ठोस पुराव्यांच्या आधारे निरसन करण्यासाठी ही सर्व महत्वपुर्ण माहिती वाचावी व या पुराव्यांच्या आधारे हिवाळी अधिवेशनात आमच्या जातीच्या दाखल्याचा प्रश्न उपस्थित करुन आमचा हा रखडलेला प्रश्न सोडवावा. अन्यथा येणार्या निवडणुकीत तुम्हा सर्वांना घरी बसवण्याची आमची जंगी तयारी झालेली असुन जर हिवाळी अधिवेशनात आम्हाला न्याय मिळवुन दिला नाहीत तर घरी बसायची तयारी ठेवा, असा गर्भित इशारा गणेश अंकुशराव यांनी दिला आहे.