करमाळा (अशोक मुरूमकर) : जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज (शुक्रवारी) स्व. मदनदास देवी यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर शासकीय विश्रमगृह येथे त्यांनी निवडक भाजपच्या पदधकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी माजी मंत्री विनोद तावडे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी उपस्थित होते.
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या हेलिपॅडवर भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, भाजपचे दीपक चव्हाण, संजय घोरपडे, अमरजित साळुंखे, सुहास घोलप, जितेश कटारिया, मनोज कुलकर्णी आदींनी त्यांचे स्वागत केले. हा दौरा यशस्वी करण्यासाठी पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. यामध्ये करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील व उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील यांच्या उपस्थितीत पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्यासह चार पोलिस निरीक्षक, ९ सहायक पोलिस निरीक्षक व उप पोलिस निरीक्षक यांच्यासह १०५ पोलिस अंमलदार व एक आरसीओ पथक तैनात होते. अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुभाष चौक ते यशवंतराव चव्हाण महाविद्यालय दरम्यान पोलिसांचे विशेष लक्ष होते.
सुभाष चौकापासून उपजिल्हा रुग्णालयापर्यंत पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. देवी यांच्या घराजवळ पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. नेहमी गजबजणाऱ्या या रस्त्यावर आज सकाळपासूनच पोलिसांनी ताब्यात घेतल्याने सर्व दुकाने बंद होती व नागरिकांची रहदारीही नव्हती. सुभाष चौक, संगम चौक, एसटी स्टँडचे दोन्ही प्रवेशद्वार, उपजिल्हा रुग्णालय येथे येणाऱ्या दोन्ही बाजूचे रस्ते, करंजकर हॉस्पिटलकडून कॉलेज रोडकडे येणारा रस्ता, विश्रामगृहाकडे जाणारा रस्ता, कॉलेज मैदानात जाणारा रस्ता येथे पोलिसांचा कडक बंदोबस्त होता.
नायब राज्यपाल सिन्हा यांचा ताफा देवी यांच्या घरजवळ आल्यानंतर सर्व गाडया सुभाष चौकात वळण घेऊन गेल्या. फक्त सिन्हा व तावडे असलेली गाडी देवी यांच्या घराजवळ वळली. त्यांनतर हा ताफा विश्रामगृह येथे आला. तेथे भाजपच्या निवडक कार्यकर्त्यांशी सवांद साधून त्यांचे स्वागत साकारले. साधारण पाऊण तास तेथे थांबल्यानंतर त्यांचा ताफा हेलिपॅडकडे आला. दरम्यान तावडे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांशी गप्पा गोष्टी केल्या. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक हिंमतराव जाधव व इतर पोलिस अधिकारी यांनी बंदोबस्त ठेवला.
देवी यांच्या घरी कोणालाच नव्हता प्रवेश?
नायब राज्यपाल सिन्हा यांचा दौरा अतिशय तंतोतंत होता. देवी यांच्या निवासस्थानी फक्त त्यांचे कुटुंबीय व बंदोबस्तावर असलेले अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. विश्रामगृह येथे मात्र काही पदाधिकारी व व्यक्तींना प्रवेश देण्यात आला. येथे सिन्हा यांची प्रमुख कार्यकर्त्यांनी भेट घेतली.