करमाळा (सोलापूर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १६१ अर्ज आले आहेत. त्यामध्ये पाटील गटाचे 51 अर्ज असल्याचे सांगण्यात येत आहे. ही निवडणूक दुरंगी होणार की तिरंगी हे अद्याप स्पष्ट नसले तरी तालुक्यातील जगताप, पाटील, बागल, शिंदे या प्रमुख गटांसह मोहिते पाटील गट व भाजपचेही काही अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे लढत कशी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वावर करमाळा तालुक्यातील नागरिकांचा विश्वास असून तालुकाअंतर्गत निवडणुकांमध्ये पाटील गटास नागरिकांनी आशीर्वाद दिले आहेत. यामुळे बाजार समितीच्या या निवडणूकीत पाटील गटाचा विजय निश्चित आहे, असे पाटील गटाचे समर्थक सुनील तळेकर यांनी म्हटले आहे.
पाटील गटाची स्पर्धा आमदार संजयमामा शिंदे यांचेशी असून इतर गटाबरोबर टोकाचे मतभेद नाहीत. आमदार शिंदे यांच्या निष्क्रियतेमुळे चार वर्ष करमाळा तालुक्यातील विकास कामे ठप्प आहेत. बाजार समितीच्या निवडणूकीत मतदार निश्चितच मतपेटीतून आपली प्रतिक्रिया व्यक्त करणार आहे. पाटील गटाकडून या निवडणुकीसाठीच्याबाबतीत निर्णय घेण्याचे सर्व अधिकार माजी आमदार नारायण पाटील यांना असून त्यांच्या आदेशानुसार या निवडणुकीतील विजयासाठी पाटील गटाचे कार्यकर्ते तयार असल्याचेही सांगत विजयाबद्दलची खात्री तळेकर यांनी व्यक्त केली.
या निवडणुकीत पाटील गटाकडून आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक नवनाथ झोळ, पाटील गटाचे युवानेते पृथ्वीराज पाटील, केमचे अजित तळेकर, पृथ्वीराज राजेभोसले, बाजार समिती माजी संचालक देवानंद बागल, माजी सभापती बापूसाहेब पाटील, नंदाताई केवारे, माजी सरपंच डॉ. अमोल घाडगे, जोतिराम नारुटे, दत्तात्रय गव्हाणे, सचिन राऊत, विजयसिंह नवले, बहुजन सेनेचे नेते राजाभाऊ कदम, बाळु पवार, संदीप मारकड, रामहरी कुदळे, नितीन हिवरे, रामेश्वर तळेकर, हनुमंत आवटे, किरण पाटील, संजय तोरमल, विलास कोकने, महेश पाटील, राहुल गोडगे, विशाल केवारे, अशोक शेळके, वैभव पाटील, छगन शिंदे, बापू लोखंडे, युवराज मेरगल, शिवाजी सरडे, रियाज मुल्ला, धनु शिरस्कर, आनंद अभंग, जयराम सोरटे, रावसाहेब शिंदे, अप्पा चौगुले, मनीशाताई कांबळे यासह अनेक पदाधिकारी या निवडणूक रिंगणात उतरले आहेत.