करमाळा (सोलापूर) : अनेक दिवसांपासून रखडलेल्या टेंभुर्णी- जातेगाव महामार्गाला आमदार संजयमामा शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळेच मंजुरी मिळाली आहे, असा दावा शिंदे गटाचे समर्थक मकाईचे माजी संचालक विवेक येवले यांनी पत्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
येवले यांनी म्हटले आहे की, नगर तर टेंभुर्णी दरम्यान असलेल्या जातेगाव ते टेंभुर्णी महामार्गाचे काम त्वरित सुरू करण्यासाठी आमदार शिंदे यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असल्यापासून पाठपुरावा केला. त्यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे त्यांनी पाठपुरावा केला.
नगर- टेंभुर्णी महामार्गाचे हस्तांतरण करणेबाबत ना हरकत प्रमाणपत्र देण्याकामी बैठक लावण्याची मागणी त्यांनी केली होती. आमदार शिंदे यांच्या मागणीनुसार चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आमदार शिंदे यांच्या उपस्थितीसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमुख अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. आमदार शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळेच हा विषय मार्गी लागला आहे. आता याची निविदा प्रक्रिया सुरु आहे, असे येवले यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना येवले यांनी म्हटले आहे की, ‘जातेगाव- टेंभुर्णी या रस्त्याचे काम २०१२ मध्ये सोलापूर सार्वजनिक बांधकाम विभागाने सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया लि. या कंपनीला प्रकल्पाचा कार्यारंभ आदेश दिला होता. ६१ किलोमीटरच्या या रस्त्यापैकी २५ किलोमीटरचे हे काम अंशतः पूर्ण केले आणि २०१५ पासून हे काम पूर्णपणे बंद ठेवले. हे काम सुरू असताना तालुक्यातील कोण- कोणत्या पुढाऱ्यांनी ठिकठिकाणी या कंपनीचे काम अडवून कंपनीकडून लाखोंची खंडणी वसूल केल्यानेच हे काम बंद पडले आणि आता फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप येवले यांनी केला आहे.
सात वर्षे बंद असलेले हे काम आमदार शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळेच सुप्रीम कंपनीकडून कल्याणी कंपनीस देण्यात आले होते. परंतु सुप्रीम कंपनी न्यायालयात गेल्यामुळे हे काम होऊ शकले नव्हते. आता मात्र हा प्रश्न कायमस्वरूपी सुटला असून या महामार्गाचे काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे ते म्हणाले आहेत.