करमाळा (सोलापूर) : पाऊस लांबल्याने करमाळा तालुक्यातील बिटरगाव श्री येथील शेतकऱ्याने उडिदामध्ये अक्षरशः ट्रॅक्टर फिरवला आहे. राज्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. पेरणी झाल्यापासून पाऊस न झाल्याने फिकं वाया गेली आहेत. त्यामुळे सरकारने त्वरित पाऊले उचलून मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
करमाळा तालुक्यात पावसाळ्याच्या सुरुवातीला थोडा पाऊस झाला होता. पुढे पाऊस पडेल या आशेनी शेतकऱ्यांनी त्या पावसावर पेरणी केली. त्यानंतर पीक उगवलेही मात्र आता पाऊस लांबला आहे. त्यामुळे पिके जळून चालली आहेत. पिके येऊ शकत नाहीत, असा अंदाज आल्यानंतर शेतकऱ्यांनी पिकात पाळी घालून मोडायला सुरुवात केली आहे. याचा मोठा भुर्दड शेतकऱ्यांना पडला आहे.
तालुक्यात जनावरांच्या चाऱ्याचाही विषय निर्माण होऊ लागला आहे. पाऊस वेळेवर पडला नाही तर या पेक्षाही वाईट परिस्थितीत होणार आहे. सरकारने याकडे गांभीर्याने पाहून मदत जाहीर करावी, अशी मागणी केली जात आहे. विहिरी व बोअरने तळ गाठला आहे. त्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. नदी, तलाव व नालेही कोरडे पडले आहेत. त्यामुळे ऊस कसे जगवायचे हा प्रश्न निर्माण झाला असून सरकारने मदत जाहीर करावी, अशी मागणी केली जात आहे.